|| चिमणीची कथा , चिमणीची व्यथा ||
चाळी पडल्या वाडे पडले
चिऊ ताईचे घरटे गेले
अस्तित्व धोक्यात आले
शहरीकरणामुळे ||१||
आता संपला चिवचिवाट
शहर वाढले अफाट
पक्षांचा होतो नायनाट
प्रगतीच्या भरांत ||२||
गावांनी कात टाकली
गावांची शहरं झाली
चिमणी बेघर झाली
आधुनिक शहरांत ||३||
टुमदार वाडा आणि
तुळशी वृंदावन अंगणी
छोटया छोटया वळचणी
सरला तो भूतकाळ ||४||
संपली आता चिव चिव
चिमणीची येते कीव
निसर्गाची एक ठेव
पहा नष्ट होते ||५||
चिमणीच्या जीवांस घोर
तिला लागली घरघर
माझे इवलेसे घर
कुठे बांधु आता ||६||
दुर्वा, गवत, झुडपे झाडे
स्मरणात आता चाळी वाडे
लाकडी खांब आणि कठडे
चिमणीचे होते जग ||७||
झाडावरच्या कोमल कळ्या
गवतामधील छोटया अळ्या
चिमण्याही आता सगळ्या
नष्ट होतील का हो ? ||८||
चिमणा आणि चिमणी
दाणा टिपती अंगणी
पाण्यात त्यांची न्हाणी
आता पहावी चित्रात ||९||
छोटी चिमणी,सुतार पक्षी
झाडावरील निसर्ग नक्षी
भूत काळांस होतील साक्षी
केवळ माणसामुळे ||१०||
नवीन तुमचे घर मोठे
चिमणीस पाहिजे घरटे
इवलेसे लाकडी छोटे
चीमणीसाठी बांधावे ||११||
घरट्यास असावी भोके
लाकडी असावे खोके
खिडकीमधे ते पक्के
बांधून तुम्ही ठेवावे ||१२||
वाढले जागतिक तापमान
सृष्टीचे बिघडले तानमान
योग्य राहील तापमान
उत्तम लाकडी घरटे ||१३||
चिमणीस गरज दाण्यांची
तशीच छोटया अळ्यांची
भूक भागविण्या पिलांची
ठेवावे दाणा पाणी ||१४||
चिमणा चिमणी सगळी
सृष्टीतील छोटी मंडळी
ती जपतात साखळी
निसर्ग, पर्यावरणाची ||१५||
दाणा पाण्यांस भांडे असावे
ते घरटयाच्या आंत नसावे
सहा फूट लांब दूर ठेवावे
घरटयापासुनी ||१६||
घरट्यास ठेवा भोक खांस
भोकाचा दोनच ईंच व्यास
शत्रू आहे कावळा तयांस
फिरकू न द्यावे ||१७||
जशी आहेत तुमची मुले
तशीच चिमणीची पिले
न व्हावे घरटे ओले
पाऊस पाण्यात ||१८||
घरट्यांस दांडी असावी
तिथे चिमणी बसावी
तिथून घरट्यात शिरावी
अशी असावी सोय ||१९||
चिमणीने सहज आत जावे
शत्रूस आंत शिरता न यावे
असे मापाचे भोक पाडावे
चिमणीच्या घरट्यांस ||२०||
घरट्यात ठेवावे थोडे गवत
चिमणी येईल तयांत
अंडे घालील घरट्यात
निरीक्षण करावे ||२१||
चिमणा चिमणी येतील
घरट्यांस त्या पाहतील
आंत बाहेर न्याहाळतील
थोडयाच दिवसांत ||२२||
आपण प्रगतीस अंगिकारणे
पण निसर्गासही जपणे
छोटया चिमणीस जगवणे
कर्तव्य आहे माणसाचे ||२३||
आवारांत फुलवा बगीचा
दाणा खाऊ चिमणीचा
मुंग्या, किडे, अळ्यांचा
निसर्ग निर्मितो ||२४||
चिमणा आणि चिमणे
होतील तुमचे पाहुणे
पडू नये काही उणे
काळजी घ्यावी ||२५||
अंड्यातून पिलू येईल
किडे खाऊन मोठे होईल
हळूच भुर्र्रर्र उडून जाईल
घरातल्या घरट्यातून ||२६||
निर्माण होईल पोकळी
नका तोडू निसर्ग साखळी
सुखेनैव नांदतील सगळी
वसुंधरेची लेकरे ||२७||
कवी - सुरेश रघुनाथ पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड,
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९
Email ID - kharichavata@gmail.com
No comments:
Post a Comment