|| आजीबाईचा बटवा ||
खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा
लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||१||
कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा
सकाळी सकाळी उठा देवाला करा तुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||२||
उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद
बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||३||
पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी
केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||४||
गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध, शंगीर
अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||५||
पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा
वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||६||
संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर
लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||७||
धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस
छोटे छोटे आजार बर का घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||८||
कवी - सुरेश रघुनाथ पित्रे.
चेंदणी, ठाणे (पश्चिम) ,
शंगीर म्हणजे काय? पर्यायी शब्द कोणता?
ReplyDelete