Saturday, June 9, 2018

येऊ दे तुफान | येऊ दे तुफान |
शहरांत आतां | पाण्यासाठी ||
एके काळी होता | चेंदणी तो भाग | जुना गावठाण | ठाणे गांव ||१||
इथे होते वाडे | अशा रचनेचे | मागे ती विहीर | पुढे घर ||२||
दोन मजली ती | टुमदार घरं | वाडा संस्कृतीची | होती गल्ली ||३||
पुढे मोठे घर | वाड्यात विहीर | रहाट गाडगं | विहिरीला ||४||
बाकी ती मोकळी | जागा झाडांसाठी | नाना प्रकारची || झाडे होती ||५||
एकूण वाड्याची | जमीन पाहिली | साठ टक्के जागा | मोकळी ती ||६||
मग अशा जागी | पाणी मुरायचे | झरे वाहायचे | विहिरीत ||७||
पाऊस पडतां | तुडुंब विहीर | भरून जायची | ओसंडून ||८||
झाडे होती खूप | त्यांना मिळे पाणी | न्हाणी घराचे ते | सोडले जे ||९||
जमिनीत पाणी | असे मुरायचे | झाडांना पाणी ते | पुरायचे ||१०||
कोणे एके काळी | चेंदणी भागांत | पाणी मुरायचे | पावसाचे ||११||
नव्हतेच तेव्हा | पाणी ते नळाला | आंघोळी सर्वांच्या | विहिरीत ||१२||
पिण्यायोग्य होते | विहिरीचे पाणी | होता तो उपसा | विहिरीला ||१३||
वाडा दिसे छान | हिरवागार तो | नैसर्गिक थंड | हवा होती ||१४||
मग दिवाळीत | सणाच्या दिवशी | थंडी हा मौसम | वाटायचा ||१५||
आता ती थंडी | नाही जाणवत | पळून ती गेली | कायमची ||१६||
उन्हाच्या त्या झळा | इतक्या नव्हत्या | मुरायचे पाणी | मुबलक ||१७||
म्हणून रे बाबा | पूर्ण वर्षभर | थोडे थंड वाटे | जुन्या काळी ||१८||
भासली नव्हती | गरज पंख्यांची | वातानुकूलन | यंत्रांचीही ||१९||
वाडे ते पाडले | चाळी हो पाडल्या | नवीन बांधल्या | इमारती ||२०||
वाडा संस्कृतीचा | नाश तो रे झाला | अध्याय संपला | एक मोठा ||२१||
काळाच्या उदरीं | गडप तो झाला | वाड्यांचा तो काळ | भूतकाळ ||२२||
शेताड जमीन | खूप होती इथे | जुन्या ठाण्यामध्ये | जुन्या काळी ||२३||
वन जमिनीची | वाताहत झाली | वृक्ष तोड झाली | खूप खूप ||२४||
गावठाण गांव | शहर बनले | शहर वाढले | चहूं दिशे ||२५||
फार थोडी आहे | जमीन उघडी | हातावर मोजा | मैदाने ती ||२६||
फार थोड्या बागा | आहेत हो छोट्या | कुठे मुरणार | पाणी आता ||२७||
रस्ता रुंदीकरण | शहरांत झाले | रस्तेही बांधले | सिमेंटचे ||२८||
भूमी बंद केली | सिमेंट लावूनी | पाणी ते वाहते | गटारांत ||२९||
पाणी थेट जाते | मोठ्या गटारांत | तिथून ते जाते | खाडीमधे ||३०||
भूमी तहानली | कोरडी पडली | थंडावा तो गेला | जमिनीचा ||३१||
झरे ते वाळले | विहिरी आटल्या | कोरड्या पडल्या | शहरांत ||३२||
कूपनलिका त्या | गृह संकुलांत | अनेक खोदल्या | पाण्यासाठी ||३३||
लागे वीज खूप | पंप ते चालती | पाणी ते आटले | जमिनीचे ||३४||
निसर्गाची टाकी | पाण्याची रिकामी | कोण भरेल ती | जाणावे बा ||३५||
उपाय तो आहे | पाणी भरा आता | निसर्गाची टाकी | पुन्हा भरा ||३६||
जितके घेतले | तितके भरावे | उपसा करावा | तितकाच ||३७||
भावी पिढीचे ते | आ-ताच घेतले | पाणी ते आ-ताच | उपसलें ||३८||
पुन्हा पाणी भरा | एक तो कोपरा | मोकळा असावा | पाण्यासाठी ||३९||
गृह संकुलात | पावसाचे पाणी | मुरविणे आहे | जमिनीत ||४०||
छपराचे पाणी | जाते वाहून ते | गटारात वाया | जाऊ नये ||४१||
पावसाचे पाणी | गोड ते निर्मळ | वाया गेले पहा | किती वर्षं ||४२||
गोड पाणी जाते | खाडीत मिळते | सांडपाणी होते | खारट ते ||४३||
खाडीत मिळते | पावसाचे पाणी | आधीच जिरवा | जरुरी ते ||४४||
आधीच मुरवा | पाणी जमिनीत | करावी व्यवस्था | त्वरेने ती ||४५||
करावा तो खड्डा | एक कोपऱ्यात | टाकावे दगड | तयामधे ||४६||
छपराचे एक | पन्हळ जोडावे | खड्ड्यात सोडावे | पाणी आता ||४७||
हजारो लिटर | पाणी ते मिळेल | शहरी भागात | आरामात ||४८||
क्षारता पाण्याची | कमी ती होईल | पाणी मुरवितां | पावसाचे ||४९||
गोड पाणी तुम्हा | पुन्हा ते मिळेल | नकोच ती चिंता | पाण्यासाठी ||५०||
सर्व शहरांत | गृह संकुलांत | पाणी मुरवावे | पावसाचे ||५१||
पाणी जिरंवावे | स्वावलंबी व्हावे | नको रडगाणे | उन्हाळ्यात ||५२||
वाढली ती संख्या | गृहसंकुलांची | पाण्याचा तो प्रश्न | सोडवावा ||५३||
भविष्यात धरण | फुटले जर ते | किती तो उडेल | हाहाःकार ||५४||
त्याचीच योजना | आ-ताच करावी | पाणी साठवा ते | जमिनीत ||५५||
नको आता प्रश्न | हिय्या तो करावा | निश्चय धरावा | पाण्यासाठी ||५६||
पाणी हे जीवन | जाण रे माणसां | होत का नाहीरे | कारवाई ||५७||
पाणी मुरविणे | सामाजिक देणे | ऋण ते फेडणे | निर्सगाचे ||५८||
होईल जीवन | सुखी समाधानी | पाणी मुरवा ते | जमिनीत ||५९||
पर्यावरणाची | साखळी जोडणे | तेच रे कल्याण | मानवाचे ||६०||
आता खेडेगावी | तुफान आलया | मोहीम चालली | जोरदार ||६१||
पण इथेसुद्धा | गरज आहे ती | शहरांत पाणी | मुरवावे ||६२||
पावसाचे पाणी | शहरीं मुरविता | वाचेल ते पाणी | धरणाचे ||६३||
हजारो लिटर | मुबलक पाणी | बचत पाण्याची | धरणांत ||६४||
उरलें जे पाणी | गावाला मिळेल | एकमेका सहाय्य | होईल हो ||६५||
वळवा ते पाणी | जिथे आहे शेती | मुबलक धान्य | पीकवा ते ||६६||
शेतीला पाणी ते | मिळेल असे हो | प्राधान्य ते द्यावे | योजनेला ||६७||
पाणी मिळतां ते | सुखाने नांदेल | बळीराजा त्याच्या | घरामधे ||६८||
गृह संकुलात | जमिनीत आता | मुरेल ते पाणी | खूप खूप ||६९||
आपणही आता | शहरांत सुद्धा | तुफान आलंया | म्हणूया रे ||७०||
येऊ दे तुफान | येऊ दे तुफान | शहरांत आतां | पाण्यासाठी ||७१||
लेखक / कवी - सुरेश पित्रे, चेंदणी, ठाणे (पश्चिम)

Friday, March 10, 2017

पक्षांना दे करवंटीचे घरटे


नमस्कार ,
शहरात कचऱ्याची समस्या खूप वाढली आहे , आणि जुनी घरे / झाडे जाऊन
तिथे उंच इमारती उभ्या राहिल्या , तर एक फोटो महाजालावर पाहिला 
त्याला अनुसरून एक कविता लिहिली आहे , जी फोटोबरोबर छापली तर 
शहरातील सर्वजण हि नामी कल्पना अमलात आणून आपली निसर्गाशी 
तुटलेली नाळ पुन्हा जोडायचा प्रयत्न करतील . फोटो मी काढलेला नाही 
त्यामुळे तो छापण्यासाठी परवानगी आहे कि नाही ते तुम्ही तपासावे , 
पण ज्याने ह्या छान कल्पनेचा फोटो काढला आहे त्यालाच अनुसरून मी कविता 
लिहिली आहे , त्यामुळे त्यांचा फोटो छापण्यासाठी आक्षेप नसावा. 
  
।। पक्षांना दे करवंटीचे घरटे ।।

माणसा तू जिथे तिथेच होते 
त्या झाडावर त्यांचे घरटे 
झाडही गेले घरही गेले 
उभारली इमारत ऊंच इथे 

फुकट जाते कचऱ्यात मिळते 
त्यात पक्षांचे घर वसते 
फेकू नका कचऱ्यात करवंटी 
त्यात होतील पक्षांची घरटी 

बांधून ठेवा ऊंच ठिकाणी 
मजेत ऐका पक्षांची गाणी  
आधुनिक जीवन प्रगती करते 
निसर्गाशी तुटले आपुले नाते 

ना तरी फुकट कचऱ्यात जाते 
निसर्ग देतो फुकट तुला ते 
इतकीच मानवा विनंती येथे 
पक्षांना दे करवंटीचे घरटे 

पक्षांची किलबिल कानी पडते 
नाळ पुन्हा निसर्गाशी जुळते 
फुलेल त्यांचा संसार इथे 
पक्षांना दे करवंटीचे घरटे 
कवी - सुरेश पित्रे, चेंदणी, ठाणे 

Tuesday, May 19, 2015

मी आहे वटवृक्ष एकटाच !

नमस्कार 
वट पौर्णिमा जवळ आली आहे , गुगलवर शोधले तर वट पौर्णिमेची तारीख वेगवेगळी सापडते  ,
त्या निमित्त एक गद्दकाव्य लिहिले आहे,
अगदी मुंबईच्या सरहद्दीवर ठाणे शहरात शिरताना, (आतल्या रस्त्याला ) कोपरी गाव  
लागते तिथे पूर्वी सर्व जंगल होते , आता तिथे मुंबई हद्दीत खाडी किनारी हरी ॐ नगर हि मोठी वसाहत 
उभी राहिली आहे , त्या वसाहतीत शिरण्यासाठी एक रस्ता विकसित झाला , त्या रस्त्यावर 
अगदी मधोमध रस्ता दुभाजक म्हणून जणूकाही तो वटवृक्ष उभा आहे , तिथून नेहमी जाता येताना 
मला त्या वृक्षाविषयी काहीतरी वाटायचे , आणि आता वट पौर्णिमेला त्याच्या फांद्या तोडल्या जातील तेव्हा जणूकाही 
तोच वटवृक्ष त्याची कथा सांगतो आहे अशा रीतीने हे गद्दकाव्य लिहिले आहे. 
शहरात उरले सुरले वृक्ष आहेत त्यांच्याही कदाचित ह्याच भावना असतील नाही का ?
- सुरेश पित्रे , ठाणे 
मी आहे वटवृक्ष एकटाच !
वट पौर्णिमेसाठी माणूस आला वडाजवळ फांद्या तोडायला  
पण वड लागला बोलायला आणि सांगु लागला त्या माणसाला  
कुऱ्हाड घेऊन तू आला आहेस माझ्या फांद्या तोडायला 
फांद्या रस्त्यावर जाऊन पडतील सुवासिनींना विकायला 
माझ्या अंगा खांद्यावर चालविणार आहेस का तू कुऱ्हाड ?
पण जरा बघ ! पक्षी, पाखरांनी थाटलय तिथे वर बिऱ्हाड 
आहे मी एकटा रस्त्यामधे, सग्या सोयऱ्यांच्या आठवणीत झुरतोय 
होते इथे जंगलमाझ्या सभोवती सखे,सोयरे, माझे सोबती 
बिल्डर नामक राक्षसाने, मुळासकट त्यांना उखडून टाकलं  
पाण्याविना तडफडून सुकून मरून गेले माझे सख्खे सोबती 
सुदैव माझं मी राहलो जिवंतउभा एकटाच आज रस्त्यावरती 
तुम्ही पहात होतात स्वप्नं कधी पुऱ्या होतील ह्या इमारती 
माझ्या सख्यांची करून मातीस्वप्न तुमची पुरी होणार होती 
मी आणि माझे सोबती देत होते शुद्ध हवा आणि प्राणवायु 
आता मी मात्र सतत हुंगतो आहे वाहनांचा विषारी काळा धूर 
झाडे कापून माणूस आळवितो आहे शहरांचा कर्कश्श सूर 
माझ्या सग्या सोबतींचा जीव घेऊन उभ्या राहिल्या ह्या इमारती 
तिथे अनेक माणसांचा , कुटुंबांचा झाला आहे वंश विस्तार 
मलाही वाटतेइथे खाली जमिनीवर माझ्या पारंब्या रुजवाव्यात 
पण आता जमिनीवर डांबर टाकून, रस्ता झाला आहे टणक आणि 
नित्यनेमाने तुम्ही स्वतःचे कापता केसतशाच कापता माझ्या पारंब्या 
नाहीतर त्यांच्या मुसक्या बांधून आवळून माझ्याच अंगावर बांधून ठेवता 
आता वट पौर्णिमेला मला पुजायला कमी येतात त्या सुवासिनी 
माझ्याभोवती ओतलय डांबर , त्यामुळे जमिनीत मुरत नाही पाणी 
मीही आता वाट पाहतो कधी येईल पाऊस आणि मिळेल मला पाणी 
पूर्वी कधी काळी प्रदक्षिणा करताना लक्ष तरी देत होते माझ्याकडे कोणी 
नशीब माझेदेवाने योजना केली आहे वेगळी माझ्या वंश विस्ताराची
ते पक्षी खातील माझी फळे , विष्ठा टाकतील जमिनीवरइमारती वरती 
त्या इमारतीवर कुठेही रुजतील त्या पक्षांच्या विष्ठेतल्या बियाआणि !
त्याच इमारतींवर उगवतील वडाची कोवळी रोपेवाढेल तो वट - वंशवेल
जणु सांगतील कि हो ! इथेच होते आमचे सखे, सोयरे आणि सोबती 
उखडून टाकून मारून टाकलेत त्यांना तरी, खुंटणार नाही हा वटवंश 
तुमच्या आधी आमचाच होता  ह्या जमिनीवर पहिला हक्क 
जणु सूड उगवतील त्या इमारतींवरज्यांच्यामुळे मेले ते सारे वटवृक्ष  
त्या साऱ्या सूड नट्ट्यावर माझ्या एकाकी डोळ्यांचे आहे इथूनच लक्ष 
मी आहे वटवृक्ष एकटाच रस्ता दुभाजक बनून रस्त्याच्या मधोमध उभा  
माझ्या दोन्ही बाजूने सतत चालु असते वर्दळ आणि ये - जा वाहनांची 
सवय झाली आहे मला आता त्या वाहनांच्या भोंग्यांच्या कर्कश्श आवाजाची
कान किटले आहेत ह्या शहरी गोंगाटानेगुदमरून गेलोय वाहनांच्या धुराने 
सग्या सोयऱ्यांच्या आठवणीतदुर्दम्य आशा ठेवुन आहे मी जगण्याची.

लेखक / कवी  - सुरेश पित्रे
पत्ता - " वैद्य सदन ", पहिला मजलाराघोबा शंकर रोड

चेंदणीठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१

Saturday, December 20, 2014

My country India bharat - poem

II दूर माझा सुजलाम देश II 

प्रेमळ माझे बाबा आई 
तशीच माझी खट्याळ ताई 
माणसे आपली दूर दूर 
मनी माझ्या हीच हुर हुर II१II 

रक्ताची नाती आपली 
प्रेमाची  देती  सावली 
आठवण त्यांची मनात भरली 
प्रतिमा त्यांची उरात कोरली II२II 

तुम्हाविना मज करमत नाही 
काही मजला उमजत नाही 
तुमची जर का साथ नाही 
या  पैशाची  किंमत  नाही  II३II 

पैसा  पैसा  आणि  पैसा 
याच्याविना कोण बोले कैसा 
पाण्याविना का जगेल मासा ?
पैशाविना का जमेल माणसा ? II४II 

काळा पांढरा अरबी झगा 
म्हणती इथे शिस्तीत वागा 
चकाचक रस्ते मॉल मस्त 
नवीन गाड्या, पेट्रोल स्वस्त II५II 

आज मी इथे उजाड परदेश 
दूर माझा सुजलाम देश 
इथली तप्त भूमी वाळवंट 
दूर आप्त हीच मनी खंत II६II 


लेखक / कवी  - सुरेश पित्रे.
पत्ता- " वैद्य सदन ", पहिला मजला, राघोबा शंकर रोड, 
चेंदणी, ठाणे (पश्चिम) , पिन कोड क्र. - ४००६०१
भ्रमणध्वनी - ९००४२३०४०९